धामोड (सतीश जाधव) : कोल्हापूर जिल्हात आजमितीस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे प्रमुख पक्ष दिसत असले तरी जिल्ह्यात शेकापला मानणारे अनेक लोक आहेत. जिल्ह्यात शेकाप बरोबरच डाव्या विचारांवर प्रेम करणारे शेकडो ठरावधारक आहेत आणि हीच मते निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे तेव्हा विरोधी आघाडीच्या वतीने शेकापच्या उमेदवाराचा विचार व्हावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी केली आहे.

गोकुळ निवडणुकीबाबत बाबासाहेब देवकर म्हणाले की, आजपर्यंत गोकुळचा इतिहास पाहिला तर किरकोळ अपवाद वगळता काही घराण्यांपुरतीच ही संस्था राहिली आहे. हा संघ मल्टिस्टेट होऊन आपल्या हाती कायम स्वरुपी रहावा यासाठी मागील दोन वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी केलेला गोंधळ आणि विरोधकांनी त्याला केलेला विरोध संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. आणि या विरोधामध्ये ‘गोकुळ बचाव’साठी प्रमुख भूमिका बजावणारे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शेतकरी कामगार पक्ष. पण आजमितीला विरोधी आघाडीच्या नेत्यांकडून उमेदवारीसाठी या पक्षाला डावलण्याचा प्रयत्न होतोय. मात्र जिल्ह्यात शेकापबरोबरच डाव्या विचारांवर प्रेम करणारे शेकडो ठरावधारक आहेत आणि हीच मते निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे विरोधी आघाडीच्या वतीने शेकापच्या उमेदवाराचा विचार होणे गरजेचे होईल. त्याचा फायदा अखेर विरोधी आघाडीलाच होईल.