कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील यड्रावमध्ये में.मतीन टेक्सटाईल्स थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांने वीजमीटरमध्ये फेरफार करून घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याने ८१ हजार १२७ युनिटची वीजचोरी केली असून त्याची रक्कम ४३ लाख ३६ हजार ४९० रूपये इतकी होते. याची तक्रार असिफ आयुब मोमीन यांचेविरूध्द आज (शुक्रवार) रोजी जुना राजवाडा, कोल्हापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महावितरणच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने ही कारवाई केली.

महावितरणच्या भरारी पथकाने ६ ऑक्टोबर रोजी यड्राव इचलकरंजी येथील में. मतीन टेक्सटाईल्स थ्री फेज औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकाच्या वीज मीटर आणि विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर आणि विद्युत संच मांडणीत वीजमीटर संथ गतीने फिरावे, अशा हेतूने फेरफार केल्याचे निदर्शनास आले. मीटर रिंडींगसाठीच्या एमडीएएस सॉफ्टवेअर प्रणालीनुसार हा ग्राहक नोंव्हेबर २०२० पासून दररोज रात्री ते सकाळ पर्यंत वीजमीटर संथ गतीने फिरावे,  अशी फेरफार केली होती.

त्यामुळे त्याने अकरा महिन्यांच्या कालावधीत ८१ हजार  १२६ युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम ४३ लाख ३६ हजार ४९० रूपये आणि तडजोड रक्कम रूपये १० लाख ५० हजार एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान  केले आहे. ग्राहकास वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.

याची फिर्याद महावितरणने दिली असून संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश मगर, नितीन जोशी, वर्षा जाधव, राजेंद्र कोरवी यांनी केली.