कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षणशास्त्र विषयातून बी.एड., एम.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी केले. विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन व शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने ऑनलाईन दुहेरी पदवी मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरविद्याशाखा अधिष्ठाता व विटा येथील कॉलेज एज्युकेशनच्या प्राचार्य प्रा. डॉ. मेघा गुळवणी होत्या.

डॉ. पाटील म्हणाले की, शिक्षकांना विविध विषयाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सुरू केलेल्या दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा, जेणेकरून शैक्षणिक ज्ञान वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक कौशल्य विकसित करण्यासाठी निश्चितपणाने दुहेरी पदवीचा फायदा होणार आहे. शिक्षणशास्त्र विषयाची पदवी घेत असताना मानवी विद्याशाखेतील पदवीला प्रवेश घेतल्यास ज्ञान शाखा विस्ताराला बळकटी प्राप्त होईल. तसेच नवोपक्रम व नवविचार व नव संशोधन यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

डॉ. गुळवणी म्हणाल्या की, बी. एड., आणि एम. एड., साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांनी दुहेरी पदवीचा फायदा घेतल्यास ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. या ऑनलाईन कार्यशाळेसाठी विविध शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील समन्वयक, सहायक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. परशुराम देवळी यांनी केले. उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे यांनी आभार मानले.