कळे ( प्रतिनिधी : धामणी खोऱ्यातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेल्या कळे-म्हासुर्ली मार्गावरील वाघुर्डे-नवलेवाडी (ता.पन्हाळा) दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुमारे दोन महिन्यापासून रखडले आहे. परिणामी बाजूची खडी बाहेर आल्याने रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग गगनबावडा यांनी सदर रस्त्याची रुंदीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. 

कळे-म्हासुर्ली या दोन प्रमुख बाजारपेठा जोडणाऱ्या मार्गाचे गेल्या काही वर्षापासून बहुतांशी ठिकाणचे रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. 

सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गगनबावडा व राधानगरी शाखांच्या देखरेखीखाली येत असून यातील गगनबावडा विभागाकडील नवलेवाडी-वाघुर्डे (ता.पन्हाळा) दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुमारे गेल्या दोन महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बाजूपट्ट्यांचे मातीमध्ये खडीकरण केले असून उर्वरित डांबरीकरणाचे काम अद्याप केलेले नाही. परिणामी केलेल्या खडीकरणातील खडी उखडून बाहेर आली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून रात्री-अपरात्री प्रवास करताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत. 

तसेच या रस्त्यावरील धोकादायक वळणावरील छोट्या मोरीचे रुंदीकरण केले असून सदर बांधकामासाठी आणलेल्या खडीचा थोडासा ढिग रस्त्याकडेला तसाच पडून आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. 

धामणी खोऱ्यातील ऊस वाहतुकीसह इतर अवजड वाहतूक तसेच शहराकडे ये-जा करणारे नोकरदार, शालेय विद्यार्थी व इतर प्रवाशी याच मार्गावरून सततचा प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. 

तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रखडलेल्या रस्ता कामाकडे त्वरित लक्ष देऊन ठेकेदाराकडून सदर काम पूर्ण करुन घ्यावे, अशी मागणी धामणी खोऱ्यातील प्रवाशी व जनतेतून होत आहे.