बेळगाव ( प्रतिनिधी ) ज्यांच्या अमोघ वाणीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात असे ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात 3 व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. बुधवार दि. 10 एप्रिल रोजी सायं. 5.30 वा. मराठा मंदिर येथे ” भारत @ 2047 ” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम येथील लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्य संघ, वाड्म़य चर्चा मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांना खुला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 2047 साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कालचा भारत, आजचा भारत आणि उद्याचा भारत कसा असेल? त्यामध्ये तरुणांची भूमिका काय असेल.

याबाबतच वैचारिक चिंतन ते आपल्या व्याख्यानातून करणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रो.अविनाश पोतदार हे राहणार आहेत. डॉ. उदय निरगुडकर बेळगावात येत आहेत या संधीचा लाभ घेऊन त्यांची बेळगावात आणखी दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. त्यामध्ये दि 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता जी एस एस महाविद्यालयात व्याख्यान होणार असून ते सर्वांना खुले आहे.बुधवार दि 10 रोजी सकाळी 11 वाजता खानापूर येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये ‘बॉर्न टू विन’ या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


निरगुडकर यांचा अल्प परिचय

झी 24 तास, न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांचे तसेच DNA या वृत्तपत्राचे यशस्वी संपादक असलेले डॉ. निरगुडकर हे अनेक IT कंपन्यांत CEO या पदावर कार्यरत होते. एक संशोधक, शिक्षण तज्ज्ञ , अर्थ तज्ज्ञ आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार, मुलाखतकार म्हणून त्यांची वाणी अतिशय प्रेरणादायी, विद्यार्थ्यांना घडविणारी आहे .भारताचे पुढील पंचवीस वर्षांचे ते रंगवित असलेले चित्र तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

निरगुडकर यांनी संपूर्ण देशाबरोबरच जगातील 50 हून अधिक देशांचा प्रवास केला असून हल्ली त्यांची फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या विविध भागात व्याख्याने होत आहेत. एक प्रेरणादायी व्याख्याते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक दिवसाच्या प्रयत्नातून त्यांचे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. समस्त बेळगावकरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.