कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज (बुधवार) सायंकाळी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास कुटुंबियांसमवेत अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. सुनिता आणि मुलगी श्रद्धा उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. करमळकर यांनी डॉ. शिर्के यांचे स्वागत केले. त्यानंतर कुलगुरूंच्या दालनामध्ये नूतन कुलगुरूंकडे सूत्रे प्रदान करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. कार्यभाराच्या पत्राचे हस्तांतरण आणि ज्ञानदंड स्विकारून डॉ. शिर्के यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. करमळकर यांच्याकडून शिवाजी विद्यापीठाचे तेरावे कुलगुरू म्हणून पदभार स्विकारला. तसेच प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभा सदस्य उपस्थित होते.