कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यासाठी वर्ष २०२२-२३ या नवीन आर्थिक वर्षासाठी एकूण १७ हजार ९८० कोटींच्या वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट दुपटीने पूर्ण करण्यासाठी बॅंकांनी अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर करणे आवश्यक आहे, असे सांगून नागरिकांच्या विविध कर्ज प्रकरणांतील त्रुटी दूर करुन घेऊन कर्ज प्रस्ताव मंजूर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागातील अधिकारी, जिल्ह्यातील सर्व सभासद बँका व वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांची विशेष बैठक घेण्यात आली. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक विश्वजित करंजकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक किरण पाठक उपस्थित होते.

यावेळी अग्रणी बँकेचा वार्षिक पतपुरवठा आराखडा २०२२-२३ पुस्तिकेचे व ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरचा वार्षिक कृती आराखडा २०२१-२२ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासकीय योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बँकांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले,  महामंडळांनी अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून द्यावा. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विविध विकास महामंडळांच्या योजनांतर्गत प्राप्त प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत १२ लाख ९ हजार ६९४ खाती उघडण्यात आली असून, ८ लाख ८० हजार ७५० खातेधारकांना रुपे ए.टी.एम. कार्डाचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या एकूण १७ हजार ९८० कोटींच्या पतपुरवठ्यापैकी प्राथमिक क्षेत्रासाठी १० हजार ७८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षापेक्षा एकूण १२ टक्क्यांनी या पतपुरवठा आराखड्यामधे अग्रणी बँकेमार्फत वाढ करण्यात आल्याची माहिती बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश गोडसे यांनी दिली.