मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही ? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका ! दोषींवर कठोर कारवाई कराच ! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही? असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकारवर चढवला.

आरोग्य भरती परीक्षांच्या गोंधळाचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘म्हाडा’ च्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. रविवारी (दि.१२)  ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात सुरु असलेल्या आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.