कोल्हापूर  (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या  कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात जिल्हा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्याकरीता तत्काळ अधिक प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

क्षीरसागर म्हणाले  की, जिल्ह्यात ऑक्सिजनच्या अभावी एका माजी सैनिकाचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे.  कोरोनाचा उद्रेक होत असताना जिल्हा प्रशासनाने तात्काळ ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करणे,  जंबो कोविड केंद्र सुरू करणे,  रेमिडेसीवीर इंजेक्शनची तत्काळ उपलब्धता,  बेड्सची उपलब्धता,  विलगीकरण केंद्र सक्षमपणे कार्यान्वित करणे, या बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. परंतु याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

यासाठी जिल्हाधिकारी यांनी विषेश प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता निविदा प्रक्रियेसारख्या किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया न राबविता तत्काळ खरेदी प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात यावी. अन्यथा,  मुख्यमंत्री  यांच्याकडे तक्रार करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हा प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असा गर्भित इशारा क्षीरसागर यांना दिला.