आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली.

मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की, यावरून दोन्ही बाजू द्विपक्षीय संबंधांना किती महत्त्व देतात हे दिसून येते. राज्य वृत्तसंस्था शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय परिस्थितीला अनुकूल असा विकास मार्ग शोधण्यात चीन मालदीवला पाठिंबा देतो. राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी चीन मालदीवला खंबीरपणे पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले. दोन्ही राष्ट्रपतींनी द्विपक्षीय संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीकडे नेण्याची घोषणाही केली.

“आज दुपारी, दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत मालदीव आणि चीनच्या सरकारांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली,” मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या वर्षी मालदीवमध्ये सर्वाधिक 2,09,198 भारतीय पर्यटक आले होते, त्यानंतर 2,09,146 रशियन पर्यटक आणि 1,87,118 चीनी पर्यटक होते.