कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सकाळी 6 च्या सुमारास “रन फॉर वोट” लोकशाही दौड पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तब्बल 6 हजार नागरिकांमनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन यांनी देखील या दौडमधे सहभाग घेतला होता.

या दौडदरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या टी-शर्ट वर भारतीय निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह छापण्यात आलेले होते. भारतीय निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह हे राष्ट्रीय ध्वज तिरंग्याच्या रंगसंगतीवर आधारित आहे. तथापि कोल्हापुरात टी-शर्ट वर बोधचिन्ह चक्क उलटे छापून या चिन्हांचा तसेच राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगसंगतीचा अवमान करण्यात आला असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत देसाई यांनी या प्रकाराला जबाबदार घटकांवर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग यावर नेमकी काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.