कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरकरांनी दान केलेल्या हजारो गणेशमूर्तींची विटंबना होईल, अशा प्रकारे विसर्जनास जबाबदार असलेल्या महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने गेले काही वर्षे सातत्याने राबविलेल्या गणेशमूर्ती दान उपक्रमास पुरोगामी कोल्हापूरकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत; परंतु या दान केलेल्या मूर्तींचे प्रशासन ज्याप्रकारे विसर्जन करते. त्यामुळे दरवर्षी या मूर्तींची विटंबना होत आहे. यावर्षी तर या दान केलेल्या मूर्ती काठावरून इराणी खणीत सोडण्यात येत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरला आहे.

मुळात मोठा गाजावाजा करून आणि माजी पालकमंत्र्यांच्या हातून उदघाटन केलेल्या स्वयंचलित यंत्रणेवरून हे विसर्जन का केले नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे आणि त्यामुळे सामान्य कोल्हापूरकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शहरवासीयांच्या भावना अक्षरशः पायदळी तुडवून दान केलेल्या घरगुती मूर्तींची विटंबना होईल, अशा प्रकारे झालेल्या विसर्जनास जबाबदार महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्याचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेलद्वारे करण्यात आली आहे.