मुंबई : मराठी चित्रपटाना चित्रपटगृह मिळण्यासाठी आणि चित्रपटगृह मिळालेच तर प्राईम टाईम शो मिळण्यासाठी झगडावे लागत होते. एखादा हिंदी बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होणार असेल, तर मराठी सिनेमांचे निर्माते त्यांचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी धजावत नसत; पण हेच चित्र गेल्या वर्षभरात इतके बदलले आहे की हिंदी सिनेमांना भारी पडत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात कोट्यवधींची कमाई होत आहे.

‘झिम्मा’, ‘धुरळा’, ‘पांडू’, ‘तमाशा लाइव्ह’, ‘धर्मवीर’, ‘चंद्रमुखी’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘टाइमपास ३’ ही कोट्यवधींची कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांची मालिका. याच पंक्तीत आता ‘चुकीला माफी नाही’ म्हणत आलेल्या ‘दगडी चाळ-२’ या सिनेमानेही कोटींचे उड्डाण केले आहे. अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ आणि आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ हे दोन्ही सिनेमे कसेबसे लाखांच्या घरात खेळत असताना ‘दगडी चाळ-२’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ३ कोटी, तर पहिल्या आठवड्यात ४.१५ कोटींची कमाई केली आहे.