मुंबई (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मात्र, कोरोनाचा नवीन ‘डेल्टा प्लस’ हा व्हेरिअंट हा अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. एम्सच्या संचालकांनी सतर्कतेचा इशारा दिला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण मिळाल्याने राज्य सरकारने आजपासून संपूर्ण राज्यात निर्बंध कडक केले आहे. या पार्श्वभूमीवर सीएसआयआर (CSIR) अर्थातच विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं हा विषाणू तितकासा धोकादायक नसल्याचे म्हटले आहे.

त्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर केल्याची माहिती ‘सीएसआयआर’चे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. डॉ. मांडे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटवर सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक असल्याचा कोणताही पुरावा शास्त्रज्ञांना आढळला नाही.  या व्हेरिअंटचा लहान मुलांवर कोणताही परिणाम होत नाही.  त्यामुळे डेल्टा प्लसला घाबरण्याचं काहीही कारण नाही. पण नेहमीप्रमाणे मास्क परिधान करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं आवश्यक आहे.

डॉ. मांडे यांनी दिलेल्या या माहितीमुळे सरकारसह जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.