कतार : फिफा विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेज त्यानंतर राऊंड ऑफ १६ चे सामने संपून आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत. आजपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत असून, पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात रात्री ८ वाजता सामना होणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचणार असल्याने दोन्ही संघ विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.

दोन्ही संघांच्या कामगिरीचा विचार केला, तर ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्यांमध्ये ब्राझीलने एकहाती पकड आजवर बनवून ठेवली आहे. एकूण दोन्ही संघांत पार पडलेल्या ४ सामन्यांतील ३ सामने ब्राझीलने जिंकले असून, एक सामना अनिर्णीत सुटला आहे. क्रोएशियाने आजवर एकही सामना ब्राझीलविरुद्ध जिंकला नसल्याने आजचा सामना जिंकून विजयी सलामीसह सेमीफायनलमध्ये क्रोएशिया एन्ट्री मारतो का ब्राझील आपली विजयी घोडदौड कायम ठेवतो.