बोरपाडळे (श्रीकांत कुंभार) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या अठ्ठावीस गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. मार्च ते सप्टेंबर २०२० या कालखंडात ३०१ रुग्णांपैकी २३९ रुग्ण खडखडीत बरे झाले आहेत. आतापर्यंत बाधितांमध्ये केवळ दहा जणांचाच मृत्यू झाला आहे.


जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत असणाऱ्या २८ गावांपैकी जेऊर, म्हाळुंगे, सोमवार पेठ, शिंदेवाडी, आमतेवडी, वेखंडवाडी, बादेवाडी वाळकेवाडी आदी गावांमध्ये कोरोना संसर्ग नाही. ग्रामसमिती आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचे आदेश तंतोतंत पाळले. दक्षता आणि सुरक्षेची जबाबदारी स्वयंशिस्तीने पाळल्यानेच हे यश आल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. अन्य कोरोनाबाधित गावांमध्येही संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असल्याने कोरोना साखळी तुटल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी नागरिकांनी अजूनही कामाशिवाय बाहेर पडू नये, आणि स्वयंशिस्त आणि सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुपरवायझर संपत पाटील यांनी केले आहे.
परिसरातील सातवे, मोहरे, काखे, बोरिवडे ही लोकसंख्येने अधिक असणाऱ्या गावांमध्येही आता कोरोना हळूहळू काढता पाय घेत आहे. एकूणच आरोग्यवर्धिनीच्या प्रयत्नांचा आदर्श अन्य जिल्ह्यांनी घ्यावा.
कोल्हापूर जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरपाडळे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अचल रंगारी यांचे सूत्रबद्ध नियोजन झाले. तसेच आरोग्य सेवेक आरोग्यसेविका, आशा वर्कर्स, गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका, शिक्षक, कोरोना दक्षता कमिटी, पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, या सर्वांच्या उल्लेखनिय कार्यामुळे कोरोना साखळी तोडण्यात यश आल्याचे डॉ. अचल रंगारी यांनी सांगितले.

असा रोखला फैलाव

एकेकाळी कोरोना कहर म्हणून ओळखलेल्या आणि लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावांमध्ये आता जनता सतर्क झाली आहे. प्रशासनाच्या प्रत्येक सूचना गांभीर्याने घेतल्याने आणि मास्क, सॅनिटायझर याशिवाय प्रत्येकाच्या घराबाहेर जाण्यापूर्वी आणि घरात आल्यानंतर सॅनिटायझर होतात. तसेच प्रत्येक तासाला घरातील मंडळी साबणाने हात स्वच्छ धूतात. लोक सजग आणि सावध झाल्याने कोरोनाचा फैलाव रोखता येतो हे माहीत झाले आहे.

हस्तांदोलन ऐवजी रामराम

एरवी काय भावा, कुठं दिसला नाहीस, असे म्हणारी तरुनपिढी ही आता सुरक्षिता ठेवून हस्तांदोलना ऐवजी ‘राम राम’ करीत आहेत. ज्येष्ठ मंडळीकडून आपोआपच भारतीय संस्कृतीचे जतन होत असल्याने तरुणांना धन्यवाद दिले जात आहे.