सिमला (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये घमासान माजले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी शुक्रवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी शिमल्यात पोहोचलेल्या पक्षाच्या निरीक्षकांचा ताफा अडवला. जोरदार नारेबाजी केली. हे समर्थक प्रतिभांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत होते.

काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष सुखविंदर सुक्खू यांनीही काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी अजून शिमल्याला पोहोचले नाहीत. त्यांच्यासोबत तब्बल १८ आमदार आहेत. सुक्खू यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. त्यांना प्रतिभा सिंह यांचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाते.

दुसरीकडे, राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी केवळ प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री तथा निरीक्षक भूपेश बघेल व हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा हे ३ नेतेच पोहोचले. त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता किंवा आमदार उपस्थित नव्हता. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या नेत्यांचे गुरुवारी रात्रभर बैठकांचे सत्र सुरू होते. यात प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखविंदर सिंह आपल्यासाठी लॉबिंग करत होते; पण त्यांच्या नावावर मतैक्य झाले नाही. मुख्यंमत्रीपदाच्या शर्यतीत राजेंद्र राणा ठाकूर, ज्वालीचे चंद्र कुमार, सोलनचे धनीराम शांडिलही आहेत.