मुंबई : आगामी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदार स्न्घ्ची निवडणूक लढण्याची घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केली आहे. सहा वर्षापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवली होती. आता या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

विधान परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. काँग्रेसने 2018 मध्ये कोकण पदवीधरची निवडणूक लढवली नव्हती. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. सहा वर्षापूर्वी भाजपाचे निरंजन डावखरे, तेव्हा एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला आणि शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या लढतीत डावखरे यांनी बाजी मारली होती.

आता महाविकास आघाडीत काँग्रेसने कोकण पदवीधर मतदारसंघावर दावा केला आहे. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास आघाडी असून काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.