मुंबई (प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे. दिवाळीपूर्वी वेतन दिले नाही, तर महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार आणि इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी संपावर जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संपावर गेल्यास ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे.

छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा ? त्यातच दिवाळी तोंडावर असताना पैशाअभावी ती साजरी तरी कशी करायची, असे प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा खळबळजनक आरोपही छाजेड यांनी केला.