कागल (प्रतिनिधी) : तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच शिक्षक हे राष्ट्रनिर्माता असल्याचेही म्हणाले. ते कागलमध्ये मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. प्रा. जयंत आसगांवकर होते.

आ. मुश्रीफ म्हणाले की, ज्यांच्या जयंतीदिनी शिक्षकदिन साजरा केला जातो, ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती होते. ब्रिटिश राजवटीत मद्रासवरून त्यांची कोलकत्याला बदली झाली. त्यावेळी अनेकांनी त्यांना बदली रद्द करून घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी सांगितले, मी बदली रद्द करून घेणार नाही आणि बदली रद्द करण्यासाठी कोणाच्याही पायासुद्धा पडणार नसल्याचे वक्तव्य केल्याचे सांगितले.

आ. प्रा. आसगावकर म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन हे नेहमीच विधायक सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असते. या पुरस्कारांमुळे चांगले काम करणाऱ्यांची ताकद निश्चितच वाढेल. जिल्हा परिषदांच्या शाळांमधूनही दर्जेदार आणि गुणवत्त शिक्षण दिले जाते याची ही प्रचिती आहे. सरकारी शाळांमधून तयार झालेले विद्यार्थीही तितक्याच क्षमतेने आपापल्या क्षेत्रात नेटाने काम करीत असल्याचे सांगितले.

यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे, माजी जि.प. सदस्य वसंतराव धुरे, शिक्षक नेते दादासाहेब लाडगटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर, डॉ. सतीश घाळी, शिरीष देसाई, एम. बी. पाटील, सुनील माने, जयदीप पोवार, बळवंतराव माने, विकास पाटील, सुनील देसाई आदी उपस्थित होते.