कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, हुतात्मा पार्क आणि पंपहाऊस परिसराची स्वच्छता महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. ७६ व्या स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. यावेळी नूतन महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला.

मंदीर परिसर स्वच्छ करण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली. नूतन महानगरपालिका आयुक्त डॉ.  बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्याहस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच या मोहिमेत सक्रीय योगदान देणाऱ्यांचा रोप देऊन सत्कारही करण्यात आले.

भगवा चौक ते शियेरोड, शेंडा पार्क ते सायबर चौक, कावळानाका ते शिरोली जकातनाका आणि रंकाळा टॉवर मेनरोड या प्रमुख रस्त्याचीही स्वच्छता करण्यात आली. प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच रस्ता दुभाजकामध्ये वाढलेले गवत, झुडपे तसेच साचलेली माती काढण्यात आली. शहरातील पंचगंगा नदी घाट परिसर तसेच पंचगंगा स्मशानभूमी परिसर, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, शाहु स्मृती बाग परिसर, हुतात्मा पार्क परिसर अशा एकूण नऊ ठिकाणी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा व प्लास्टिक गोळा केले. यामध्ये तीन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले.

या मोहिमेत महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर हसिना फरास, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, विकी महाडीक, क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर व स्वरा फौंडेशन प्रमोद माजगावकर, आदित्य पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.