सोलापूर ( प्रतिनिधी ) भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर कारखान्याचा 44 वा बॉयलर अग्नी प्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुरु होत असलेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल 5 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा केली.


यावर्षी भीमा कारखान्याचा रोख काटा पेमेंटकडे आहे हे स्पष्ट केलं. तर कारखान्याचे मार्गदर्शक, संचालक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत 2400 रुपये पहिली उचल जाहीर केली.

चेअरमन विश्वराज यांनी पुढे बोलताना कारखाना कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी बोनस यासह 15 किलो साखर मोफत देणार असल्याची देखील घोषणा केली. चेअरमन विश्वराज महाडिक यांनी काटा चोख असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस भीमा कारखान्यालाच घालवायचा असतो,

मात्र गेल्या काही वर्षांतील बिलाला होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी नाईलाजास्तव दुसरीकडे ऊस घालतात हे ओळखून यावर्षी काटा पेमेंट म्हणजेच 5 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार असल्याची घोषणा केली. विश्वराज यांनी काटा पेमेंट देणार असल्याचे जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत एकच जयघोष केला.