कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमध्ये होणार आहे. स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिषदेची तारीख निश्चित करण्यात आली. यामुळे कोरोनामुळे यंदा ऊस परिषद होणार की नाही, यासंबंधी निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
प्रत्येक वर्षी ऊस परिषदेत हंगामातील उसाचा दर निश्चित केला जातो. त्यानंतर कारखानदारांशी दरासंबंधी बैठक होवून तडजोड झाल्यानंतर कारखाने सुरू होतात. पण यंदा कोरोनामुळे परिषदेसंबंधी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शेट्टी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदाही परिषद घेणारच अशी घोषणा केली होती. त्यानुसार परिषदेची तारीख निश्चित करण्यात आली.
या बैठकीस स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील, युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.