कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून शिरकाव केला. तर सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ६० हजार रुपयांची रक्कम असा १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याची फिर्याद विद्यानंद आदिनाथ दानोंळे (वय ४२, रा.अकिवाट) यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे.

फिर्यादीमध्ये म्हटले  आहे की, अकिवाट येथील काळम्मावाडी रस्त्यावरील कागेवेस येथील दानोळे हे गावी गेले होते. सोमवारी मध्यरात्री सुमारास त्यांच्या घराचे कुलूप कटावणीने उचकटून दरवाजा खोलून एका चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून तिजोरीतील ४८ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने आणि ६० हजार रुपयांची रक्कम असा १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.