बिद्री ( प्रतिनिधी ) भोगावती साखरच्या तोफा थंडावल्या आणि आता दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी लढत सुरु झाली. आणि बिद्री पंचक्रोशीत राजकारणाच्या उलथा – पालथी सुरु झाल्या. त्यामुळं भोगावती खोरं शांत झालं आणि बिद्री खोऱ्यात निवडणूकीनं वातावरण बदलू लागलं आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुरंगी लढत होत असून, आज चिन्ह वाटप करण्यात आलं. यामध्ये सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विमान, तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला कपबशी हे चिन्ह दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार बिद्री कारखान्यासाठी येत्या 3 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गट सक्रीय झाला आहे.
श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजितसिंह घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे व भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीनं आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.