अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये भाजपने १५६ जागा जिंकून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १९८५ मध्ये विधानसभेच्या १४९ जागा जिंकल्या होत्या. त्याच वेळी, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना २००२ च्या निवडणुकीत भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. या विजयासह भाजपने दोन्ही विक्रम मोडीत काढले आहेत.

या ऐतिहासिक विजयानंतर १२ डिसेंबर रोजी गांधीनगर येथील विधानसभेच्या मागे असलेल्या हेलिपॅड मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान मोदी म्हणाले होते, भूपेंद्र नरेंद्रचा विक्रम मोडतील. निवडणुकीच्या निकालात नेमके हेच दिसून येत आहे. भाजप समर्थक आनंद साजरा करत आहेत.

गुजरातमधील विधानसभेच्या १८२  जागांपैकी भाजपने १५६ जागा जिंकल्या आहेत. २०१७  च्या तुलनेत ५८ जागा वाढल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला सर्वाधिक ६१ जागांचे नुकसान झाले आहे. गेल्या वेळी पक्षाला ७७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ १६ जागा मिळाल्या आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा जनादेश आता स्पष्ट झाला आहे, दोन दशकांपासून सुरू असलेला गुजरातचा विकासाचा हा प्रवास सुरू ठेवण्याचा इथल्या जनतेने निर्धार केला आहे. येथील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर अढळ विश्वास दाखवला आहे.

मोदी यांनी मानले आभार

गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ‘मला गुजरातमधील सर्व मेहनती कार्यकर्त्यांना तुम्ही चॅम्पियन आहात असं सांगायचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य नव्हता. हे कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद आहे,’ असे नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.