कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून कुंभार समाजाची अवस्था बिकट बनली आहे. त्यातच गणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असता सरकारने मंडळांच्या मूर्ती ४ तर घरगुती २ फूट उंचीच्या असाव्यात असे निर्बंध घातले आहेत. यामुळे कुंभार व्यावसायिक आणखी अडचणीत आले आहेत. या समाजाचे कोरोना काळात आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हेतूने मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करावी, या समाजाला आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे करण्यात आली. आज (सोमवार) याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी इ-मेलद्वारे पाठवले आहे.

निवेदनांत म्हटले आहे की, वास्तविक कुंभार समाज प्रचंड आर्थिक अडचणीत आला असताना असे निर्बंध घालण्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून समाजातील या घटकाचा गांभीर्याने विचार करायला हवा होता. त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. पण या एकतर्फी निर्णयामुळे कुंभार समाजाला या वर्षीही आर्थिक फटका बसणार आहे. कुंभार बांधव आपल्या व्यवसायाची किंवा गणेशमूर्ती तयार करण्याची सुरवात जानेवारी महिन्यापासूनच करत असतात. आजच्या घडीला ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या शिल्लक गणेशमूर्ती आणि यंदाच्या तयार ५ ते १० फुटांच्या मूर्ती यांचे करायचे काय ? झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे काय ? बँक कर्जाचे हप्ते फेडायचे कसे ? असे अनेक प्रश्न आज कुंभार समाजासमोर आहेत. त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.

याच आशयाचे पत्र राहूल चिकोडे यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना पाठवले आहे.