मुरगूड (प्रतिनिधी) : ‘आदर्श लोकशाहीच्या वाटचालीसाठी सुजाण नागरिक बनण्याची गरज आहे’, असे मत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, मुरगूड नगरपरिषद व महसूल विभाग यांच्या वतीने झालेल्या ‘मतदार जागृती रॅली’ मध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, व्यक्ती स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता तसेच धर्मनिरपेक्षता, समाजवाद ही लोकशाहीची मूल्ये आणि तत्वे नागरिकांनी अंगीकारणे गरजेचे आहे.

ही मतदार जागृती रॅली मंडलिक महाविद्यालय, शिवराज विद्यालय, मुरगूड पोलीस स्टेशन, नगरपरिषद, मुरगूड बसस्थानक, तुकाराम चौक या मार्गावरून काढण्यात आली. यावेळी ‘मतदार राजा जागा हो…लोकशाहीचा धागा हो, आपले मत…आपला आवाज, अठरा वर्षे केले पार…मतदानाचा मिळाला अधिकार’ अशा घोषणा देण्यात आल्या. लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मतदार जागृती रॅली काढण्यात आली. प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी रॅलीची सुरुवात करून दिली.

मुरगूड नगरपरिषदेचे अनिकेत सूर्यवंशी, रणजित निंबाळकर, दत्ता कांबळे, संदीप पाटील तसेच महसूल विभागाचे सीताराम कांबळे, मधुकर कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. एम. ए. कोळी यांनी केले. मोहन रणवरे यांनी आभार मानले. संयोजन प्रा. डी. व्ही. गोरे, प्रा. सुशांत पाटील, प्रा. स्वप्नील मेंडके यांनी केले. उपक्रमास खासदार प्रा. संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन लाभले.