कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कोरोना पार्श्वभूमीवर १६ वर्षे वयाची ऑटोरिक्षा वयोमर्यादा ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व ऑटोरिक्षा धारकांना असलेल्या अडचणींचा विचार करुन कोल्हापूर सह ग्रामीण भागासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या परिचलन बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
ते म्हणाले, मुंबई व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये ऑटोरिक्षाकरिता सुधारित वयोमर्यादा वर्ष व गणनेचा दिनांक १ ऑगस्ट २०२१ पर्यँत २० वर्षे आणि १ ऑगस्ट २०२२ पर्यंत १८ वर्षे, १ ऑगस्ट २०२३ पर्यंत १६ वर्षे व १ ऑगस्ट २०२४ पर्यंत १५ वर्षे अशी सुधारित वयोमर्यादा निश्चित केली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, सदस्य तथा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेवून ऑटोरिक्षा धारकांना एक अनोखी भेट दिली आहे.