कळे (प्रतिनिधी) : भारताचे न्यायमूर्ती भुषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या पार्श्वभूमीवर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आरोपी राकेश किशोर तिवारी या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करत कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील कळे (ता.पन्हाळा ) दस्तुरी चौक येथे संघर्ष बहुजन सेना पन्हाळा तालुक्याच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर कळे पोलिस ठाण्यात याबाबत निवेदन देण्यात आले.  

निवेदनात म्हटले आहे की, ही घटना न्यायालयातील सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करणारी असून, आरोपी वकिलाने स्वतःला ‘सनातनी’ म्हणवून न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून, भारतीय संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली झाली आहे. या घटनेमुळे देशाच्या एकात्मतेला आणि धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे, ही केवळ व्यक्तिवर हल्ला नसून, संपूर्ण घटनेविषयीची विचारधारा आणि संविधानावरच हल्ला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी संघर्ष बहुजन सेनेचे उपाध्यक्ष सत्तापा पोवार, युवराज वांद्रे, रमेश कांबळे,एकनाथ कांबळे,अरुण कांबळे,बाजीराव कांबळे,अशोक कांबळे, विलास कांबळे, नितीन वांद्रे,देवदास कांबळे, निलेश कांबळे,अशोक श्रावस्ती, विठ्ठल कांबळे, प्रथमेश कांबळे, सिद्धार्थ साखरीकर, दत्ता पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.