हातकणंगले ( प्रतिनिधी ) मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रासह हातकणंगले तालुक्यात हजारो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीनुसार अनेकांनी आपले दाखले काढण्यासाठी कागदपत्रे हातकणंगले तालुक्यात जमा केली आहेत.

पण हातकंणगले तालुक्यात कुणबी दाखले काढण्यास विलंब लागत असल्याचे तसेच काही अधिकारी दाखले देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे दाखले मिळत नसल्याचे अनेकांच्या तक्रारी असून या प्रलंबित कुणबी दाखल्यासाठी आज बुधवार (दि. 21) पासून हातकणगले तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

शासकीय दप्तरी कुणबी नोंदी सापडलेल्यांनी आपला कुणबी दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्णकरूनही काही अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात शिबिरे घेऊन कुणबी दाखले वितरित करण्यात येत आहेत. मग हातकणमध्येच का मिळत नाहीत यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

5 फेब्रुवारी 2024 रोजी हातकणगले तहसीलदारांना निवेदन देऊन 20 फेब्रुवारी 2024 रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण तरीही तहसीलदार यांनी याबाबत कोणतीही कारवाई न केलेने आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगितले.