मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड नगरपालिका निवडणूक तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रभाग रचनेस निवडणूक आयोगाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. आता वेध प्रभाग आरक्षणाचे व प्रभागवार मतदार यादीचे लागले आहेत. त्याचबरोबर आज (सोमवारी) नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत होत आहे, त्याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिवाळीनंतर पालिका निवडणुका होणार असल्या तरी निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला कमालीचा वेग आला आहे. प्रभाग निश्चितीचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळाली असून डिसेंबरमध्ये पालिका निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

नगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक…

पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवड थेट नागरिकांतून होणार हे आता स्पष्ट झाले असून नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे आज मुंबईतील आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होईल. सर्वसाधारण गटाच्या इच्छुकांनी आपले इतर मागास प्रवर्गाचे दाखले अगोदरच प्राप्त केल्याने त्यांचा खरा डोळा नगराध्यक्षपदावर असल्याचे दिसून येते. तसेच नगराध्यक्षपदावरूनच राजकीय महाभारत या निवडणुकीत दिसून येणार आहे. प्रभाग आरक्षण निश्चित नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार यावरच अनेकांचे राजकीय भवितव्य आहे. इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला आहे. आपली राजकीय शक्ती आजमावण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे.

मुरगूडमध्ये सध्या सहा राजकीय गटाचे अस्तित्व तयार झाले आहे. त्यांनी स्वतंत्र मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपल्या गटाची कोणत्या गटाबरोबर युती फायद्याची ठरणार? याचा अंदाज सर्वच राजकीय गट सावधपणे घेत आहेत. प्रामुख्याने मंडलिक मुश्रीफ पाटील बंधू, घाटगे व जमादार अशा प्रमुख गटांत पालिकेची निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही, पण कोणता गट कोणाशी युती करेल हे अंतिम क्षणीच ठरणार हे निश्चित. प्रत्येक स्थानिक गट आपल्या गटाच्या स्वतंत्र बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते आजमावत आहेत. त्यानंतर नेतेमंडळींवरच युतीचा निर्णय अवलंबून राहणार आहे. येथील दहा प्रभागांचे आरक्षण आणि मतदार यादीवर इच्छुकांचा डोळा असून राजकीय हालचालींना वेग येणार आहे.