टोप (प्रतिनिधी) : सादळे-मादळे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अमिर पटेल हे विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनचे सदस्य वसंत मारुती कोरवी यांचे निधन झाल्याने या रिक्त पदासाठी निवडणूक लागली होती.  

प्रभाग क्रमांक तीन हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होता. या निवडणुकीत अमिर धोंडीबा पटेल आणि दत्तात्रय बाजीराव शिंदे हे दोन उमेदवार रिंगणात उतरले होते. या प्रभागात एकूण ३७९ मतदार होते. यामध्ये ३२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर अमिर पटेल यांना २२६ तर दत्तात्रय शिंदे यांना ९४ मते मिळाली. यामुळे  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पटेल यांना विजयी घोषित केले. यावेळी पटेल यांच्या समर्थकांनी गुलाल उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.