आजरा पोलिस व वनविभागाने संयुक्त कारवाई करत दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार घाटकरवाडी (ता. आजरा) परिसरात तस्करीच्या हेतूने नेण्यात येणारी सुमारे दोन किलो वजनाची दोन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. या कारवाईत सिंधुदुर्ग व गोवा येथील सहाजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम आजरा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आजरा पोलिसांना शनिवारी दुपारी आजरा पोलिसांना गोव्याहून व्हेल माशाची उलटी आजरामार्गे तस्करीसाठी येणार असल्याचे समजले. यानुसार पोलिसांनी सापळा रचत गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजीव नवले, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, अजित हट्टी, भाग्यश्री चौगुले, आजरा वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता डाके यांचे पथक आजरा-आंबोली मार्गावर तैनात करण्यात आले.

यानंतर घाटकरवाडी येथे सायंकाळ पाचच्या सुमारास आंबोलीकडून आलेल्या या दोन संशयित चारचाकी वाहनांची झडती घेण्यात आली. सुरुवातीला वाहनांतील तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी तस्करीसाठीची व्हेल माशाची उलटी असल्याचे कबूल केले. पोलिसांनी ही उलटी जप्त केली आहे. तसेच सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.