कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये कोव्हिड लसीकरण शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरू असून सोशल मीडियाद्वारे जी रुग्णालयाची बदनामी सुरू आहे त्याबाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रुग्णालयाच्या अधिक्षीक डॉ. विद्या पॉल यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिला.

वसाहत रूग्णालयात मागील दाराने पैसे घेऊन लस दिली जाते, हा आरोप निखालस खोटा असल्याचे स्पष्ट करताना डॉ. पॉल म्हणाल्या की याबाबत तक्रारदाराने पुरावा सादर केल्यास कारवाई करण्यात येईल. फ्रन्टलाईनच्या व्यक्तीना लसीकरणमध्ये प्राधान्य दिले जाते, त्याबाबत काहीजण गैरसमज करून देतात. एका लोकप्रतिनिधीने लसटोचणी मोहिमेत हस्तक्षेप केल्याबद्दल मंत्रीपातळीवर तक्रार झाल्याने रुग्णालयाने त्यांना वेळीच अटकाव केला. लसीकरणाचा सुमारे दहा हजाराचा टप्पा गाठला असून दरम्यानच्या काळात रुग्णालयाकडे एकही तक्रार आली नाही. काहीनी कुभांड रचून रुग्णालयासह मला व माझ्या सहकारी डॉक्टरांसह स्टाफला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे, तो गैर आहे आणि तो खपवून घेतला जाणार नाही.

रुग्णालयात येणाऱ्या महिलांबरोबर काही तोतया पत्रकार लज्जास्पद बोलून, चित्रण करून ते सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून डॉ. पॉल म्हणाल्या, की रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तनाचा प्रकारही झाला असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लसीकरणाबाबत विघ्नसंतोषी लोकांकडून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, सर्वांना लस मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेस डॉ. बिना रुईकर, डॉ. श्रीधर वाघ, डॉ. चंद्रकांत कुराडे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. निलीमा पाटील, डॉ. सुनिता माळवे, डॉ. प्रदीप सुतार, डॉ. युवराज हेरलेकर, परीसेविका सुमन चव्हाण, पुष्पलता बर्गे उपस्थित होत्या.