मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणाने महाराष्ट्रात स्मार्ट मीटर सक्तीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभमीवर आम आदमी पार्टीने आजाद मैदान, मुंबई येथे बेमूदत उपोषण सुरु केले आहे.

यावेळी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय भांडवलदारी कंपन्यांना फायदा करण्यासाठी घेतला गेला आहे. या कंपन्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला देणग्या दिल्याचा आरोप होत आहे. या स्मार्ट मीटर्सचे टेंडर अदानी ग्रुप, एनसीसी कंपनी, आणि मॉन्टेकार्लो कंपनी यांना दिलेले असून, या कंपन्या प्रत्यक्षात स्मार्ट मीटर निर्मिती करत नाहीत. त्यामुळे हा निर्णय संशयास्पद असून, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंध आणि घोटाळा झाल्याचा आरोप आपचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी केला.

जोपर्यंत राज्य सरकार याबाबत ठोस भूमिका घेत नाही, तो पर्यंत हे उपोषण सुरू राहणार असून, स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात प्रसंगी ऊर्जा मंत्र्यांना घेराव घालू ,असा इशारा प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई यांनी दिला आहे.

स्मार्ट मीटरचा उपक्रम आणण्यामागे महायुती सरकारचा खरा उद्देश म्हणजे राज्यातील पूर्ण वीज वितरण प्रणालीचे खाजगीकरण करणे आहे. त्याप्रमाणे विज क्षेत्रात खाजगीकरण करून आंदण देण्याचा कुटिल डाव आमआदमी पार्टी कदापी यशस्वी होऊन देणार नाही, असे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केले.

यावेळी सरकारने अधिकृतरीत्या लेखी स्वरूपात स्मार्ट प्रीपेड मीटर राज्यात लावल्या जाणार नाही असे स्पष्ट करावे. तसेच स्मार्ट मीटर लावण्यासंबंधीचे सगळे टेंडर तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्मार्ट मीटर लावल्यामुळे वीज चोरी थांबणार असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. वीज चोरी बहुदा २० के.वि. पेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणाऱ्या ग्राहकांकडून होते. सरकारने जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. स्मार्ट मीटरच्या नावाखाली अकाऊंट आणि बिलिंग विभागाच्या कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याने हजारो कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या आंदोलनात आपचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, धनंजय शिंदे, डॉ. रियाझ पठाण, भूषण ढाकुलकर, मनीष मोडक, नविंदर अहलुवालिया, राज्य, जिल्हा आणि महानगर पालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती लावली आहे.