गांधीनगर (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील भूमी अभिलेख कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी अमोल एकळ फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केली आहे. आज (मंगळवार) जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. वसंतराव निकम यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

गांधीनगर येथील भूमी अभिलेख कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. अनेकांच्या नोंदी, विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने मिळकतधारकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय कामांंसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडील कागदपत्रांची मालमत्ताधारकांना गरज भासत आहे. कोरोनामुळे संसर्गामुळे बंद ठेवलेले हे कार्यालय योग्य ती दक्षता घेऊन ताबडतोब सुरू करावे. अन्यथा, जनतेच्या मागणीसाठी लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही अमोल एकळ यांनी निवेदनाद्वारे दिला.

शिष्टमंडळाच्या मागणीनंतर जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. वसंतराव निकम म्हणाले की लवकरच हे कार्यालय सुरू करण्यात येईल. तसेच मिळकतधारकांची गैरसोय दूर करण्यात येईल.