कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. सुभाषनगरमधील आज (शुक्रवार) पहाटे ज्योर्तिंलिंग नगरात महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या बंगल्यात घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. दिलीप शंकर जानवेकर यांच्या बंगल्याचे कुलप-कोयंडा तोडून चोरट्यांनी दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केलीयं. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सुभाषनगर येथील सिरतमोहल्ला येथे महापालिकेचे निवृत्त अधिकारी  जानवेकर यांचा बंगला आहे.   गेल्या काही दिवसांपासून जानवेकर कुटूंबीय सावंतवाडी येथे मुलाकडे राहतात. दिवाळी निमित्त जानवेकर कुटुंब नुकतेच कोल्हापूरला परतले आहे. आज (शुक्रवार) पहाटे जानवेकर मॉर्निंग वाकसाठी घरातून बाहेर पडले होते, तर जाताना त्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावले. कुटूंबातील इतर सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. पहाटे सहा वाजता बाहेरुन फिरुन आलेनंतर बंगल्याच्या लोखंडी दरवाजा उघडा दिसला. मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यांनी मुलगा, पत्नी, सूनेला हाक मारुन खाली बोलवून घेतले. त्यानंतर घरातील तिजोरी, किचन रुममधील साहित्य विस्कटलेले दिसून आले. तिजोरीतील दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड गायब झाल्याचे निदर्शनास आले . जानवेकर कुटूंबियांनी तात्काळ या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. गुन्हे शोध पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातचं घुटमळले. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.