कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.
ही परीक्षा युपीएससीतर्फे १३ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. इयत्ता बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. लेखी परीक्षेत यशस्वी होत, यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर एसएसबी मुलाखत प्रयागराज येथे झाली. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात 18 वा क्रमांक प्राप्त केला.
यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, इयत्ता 11 वीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या YES स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. लहानपणापासूनच त्याने एनडीएमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे. हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले.
यावेळी बोलताना यशराज म्हणाला, “लहानपणापासून पाहिलेले माझे भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न आज सत्यात उतरले. यासाठी कष्ट, अभ्यास, खेळाची आवड तसेच सर्व सहशालेय उपक्रमात सहभाग ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. माझ्या या यशात माझी आई अर्चना पाटील हीचा मोलाचा वाटा आहे. तिचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मला हे शक्य झाले.”
यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सास्मिता मोहंती म्हणाल्या, “यशराजने सातत्य, कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणारा आहे.” संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच. एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी यशराजचे अभिनंदन केले व सत्कार केला. या यशामुळे यशराजचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.