कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र राज्य संघटक चंगेजखान पठाण आणि जिल्हाध्यक्ष वैभव उगळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. मात्र, ‘मातोश्री’वरून महाविकास आघाडीसोबत युती करण्याचे आदेश आल्यास त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल जर महाविकास आघाडीने आम्हाला विश्वासात घेतले तर, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक शिवसेना (उ.बा.ठा.) १००% स्वबळावर लढवेल, असा विश्वास चंगेजखान पठाण यांनी व्यक्त केला. यासंबंधात वरिष्ठांशी बोलणार असल्याचे ही सांगितले. कुरुंदवाड नगरपालिकेच्या २० जागांसाठी आणि नगराध्यक्षपदाच्या तिकिटासाठी पक्षाकडे सक्षम उमेदवार उपलब्ध असून, त्यांच्यासाठी वरिष्ठांकडून तिकिटाची मागणी केली जाईल, असे पठाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या निर्णयामुळे शिरोळ तालुक्यात, विशेषत: कुरुंदवाडमध्ये, आगामी नगरपालिका निवडणुकीत राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचे आदेश येण्यापूर्वीच शिवसेनेने (उ.बा.ठा.) स्थानिक पातळीवर स्वबळाचा नारा दिल्याने तालुक्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
या पत्रकार बैठकीला तालुका प्रमुख संजय अणुसे, शहर अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर,राजू आवळे, मंगलताई चव्हाण, वैशाली जुगळे, राजेश्री मालवेकर, गणेश गुरव आदी शिवसैनिक उपस्थित होते.