कोल्हापूर दि.२६ : कसबा बावडा परिसरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून सेवा रुग्णालय ही त्यांची नितांत गरज आणि आवश्यकता आहे. त्यामुळे त्या रुग्णालयाचे विस्तारीकरण व इतर प्रश्न बफर झोनमुळे न थांबता, त्या नियमांमध्ये शिथिलता आणावी. यासह बफर झोन मुळे स्थानिक रहिवासी नागरिकांनाही बांधकामाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत ५०० मीटर असणारे बफर २०० मीटर करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी माहे मे महिन्यात पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली होती. यानंतर सातत्याने आमदार राजेश क्षीरसागर यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी यांच्यासमवेत शासनाकडे पाठपुरावा केला. आमदार क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, झूम प्रकल्पाच्या हद्दीतील बफर झोन ५०० वरून २०० मीटर करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोल्हापूर महानगरपालिकेस दि.१७/०९/२०२५ रोजीच्या पत्रान्वये संमती देण्यात आली आहे.
याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यात पुढे म्हंटले आहे कि, कसबा बावडा लाईन बझार परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर कसबा बावडा ते शिये ग्रामीण भागापर्यंत सुमारे १ लाख नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णसेवेसाठी हे रुग्णालय सुसज्ज व्हावे. याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात. दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा याठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून, महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेले सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबीटकर बैठक घेण्यात आली होती. यामध्ये रुग्णालय हि अत्यावश्यक सेवा आहे. होणाऱ्या इमारतीचा वापर आरोग्य सेवेसाठी होणार आहे. सदर इमारतींचे बांधकाम बफर झोनच्या शेवटच्या टोकाला होणार असून, याकरिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अटी शिथिल करून २०० मीटर बफर झोन करणे आवश्यक होते. बफर झोन २०० मीटर झाल्यामुळे सेवा रुग्णालयाचे विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये सद्यस्थितीत ५० खाटांचे असणारे रुग्णालयाची खाटांची संख्या वाढवून सुमारे २५० इतकी करता येईल. यामध्ये महिला विभागासाठी १०० खाट, सिव्हील विभागासाठी ५० खाट आणि क्रिटीकल केअर युनिट विभागाचे ५० खाटांची क्षमता असणाऱ्या इमारती यांचा समावेश आहे. त्यामुळे पुढील काळात दर्जेदार आणि मोठ्या संख्येने रुग्णसेवेचा लाभ या रुग्णालयाच्या माध्यमातून मिळणार आहे. यासह परिसरातील नागरिकांच्या बांधकामाच्या समस्याही सुटणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
Post Views: 176