रायगड (प्रतिनिधी) : रोहा तालुक्यातील तांबडी येथे 26 जुलै 2020 रोजी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खूनाच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 8 मे 2025 रोजी माणगाव सत्र न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे, पेणमधील नवख्या वकिलांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव करणे ही आश्चर्य आणि विश्वास न बसणारी गोष्ट आहे. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, खरे मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले आणि श्रीमंत, प्रभावशाली आरोपीला पोलिस व राजकीय पाठबळाने वाचवण्यात आले, असा गंभीर संशय सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमकुवत होती की, ती न्यायालयात टिकलीच नाही. पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या. पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले, पण ठोस पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे अपयश आले. सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांनी जाणीवपूर्वक तपास ढिसाळ ठेवला आणि खऱ्या आरोपीला कदाचित श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवले. तत्कालीन पोलिस अधीक्षक आणि रोहा उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तपासावर संगनमताचे गंभीर आरोप होत आहेत. खरा आरोपी लपवण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक पुरावे नष्ट केले का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.