हैदराबाद (वृत्तसंस्था) : हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टरला अटक करण्याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे. या महिला डॉक्टरला कोकेनसह अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरने तब्बल 5 लाखांचं कोकेन मागवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नम्रता चिगुरुपती असं या डॉक्टरचं नाव असून, पोलिसांनी तिला कोकेन स्विकारताना रंगेहाथ पकडलं आहे.

नम्रता चिगुरुपतीने सहा महिन्यांपूर्वी ओमेगा हॉस्पिटल्सच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. नम्रता चिगुरुपतीने मुंबईतील पुरवठादार वंश धक्कर याच्याकडून कोकेन मागवलं होतं. कुरिअरद्वारे पाठवण्यात आलेले हे कोकेन स्विकारत असताना तिला अटक करण्यात आली. तिच्यासह वंश धक्कर याचा सहकारी बालकृष्ण जो कोकेनच्या डिलिव्हरीसाठी आला होता, त्यालाही पकडण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नम्रता चिगुरुपतीने व्हॉट्सपअपच्या माध्यमातून कोकेनची ऑर्डर दिली होती. तिने सर्व पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. त्यामुळे सायबर पोलीसांनी याचा शोध घेत तिला अटक केलीय. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, असं वेंकण्णा म्हणाले. चौकशीदरम्यान, तिने आतापर्यंत ड्रग्जवर सुमारे 70 लाख रुपये खर्च केल्याची कबुली दिली आहे.