जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ज्या व्यक्तीनं मदत केली, त्याने नदीत उडी मारून स्वत:ला संपवलं आहे. दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली या आरोपीनं दिली होती. दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला आणि त्याने विश्वा नदीत उडी मारली, असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आरोपीने नदीत उडी मारतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इम्तियाज अहमद मगरे (वय 23) असं या आरोपीचं नाव आहे.
इम्तियाज मगरे याला पोलिसांनी ३ मे रोजी ताब्यात घेतलं होतं. पहलगामच्या दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पोलीस त्याला ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणाहून त्याला दहशतवाद्यांच्या तळावर नेलं जात होतं. मात्र, पोलिसांच्या हातातून सुटून त्याने विश्वा नदीत उडी घेतली आहे. त्याचा यात मृत्यू झाला आहे.