अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी मलिक यांनी 6 हजार पोलीस तैनात केले आहेत. स्टेडियममध्ये 3000 पोलीस बंदोबस्त असणार आहे.

सामन्याच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी स्टेडियममध्ये अंतिम तयारीचा आढावा घेतला. मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, विमानतळ, खेळाडूंची हॉटेल्स तसेच स्टेडियमच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जीएस मलिक म्हणाले की, विमानतळासह हॉटेल्स आणि स्टेडियमच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

मलिक म्हणाले की, सामन्याच्या सुरक्षेसाठी भारतीय वायुसेनेच्या दोन तुकड्या, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि चेतक कमांडोच्या दोन तुकड्यांसह बॉम्ब निकामी करणाऱ्या 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

स्टेडियममधील मोबाईल चोरीच्या प्रश्नावर पोलीस आयुक्त म्हणाले की, लोकांनीही आपल्या मोबाईलची काळजी घ्यावी. ते म्हणाले की काही तक्रारी वगळता मागील सामन्यांमध्ये फारशी प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. बनावट तिकिटांच्या विक्रीबाबत पोलीस आयुक्त म्हणाले की, असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही, असे प्रकरण समोर आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील.