पाटण (वृत्तसंस्था) : बिहारमधील सारण (छपरा) येथे विषारी दारूमुळे ६० जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता सिवानमधूनही मृत्यूच्या बातम्या येत आहेत. तेथे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बेगुसरायच्या तेघरा येथेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यावरून विधानसभेत सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. खुर्च्या फेकण्यात आल्या. आता सरकार बरखास्त करण्याची मागणी करत विरोधकांनी राजभवनावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. या दुर्घटनेमुळे अनेक गावांवर शोककळा पसरली आहे.

विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यावर नितीश म्हणाले की, दारू पिऊन मृत्यू झाला, तर सरकार नुकसानभरपाई देणार का? एक पैसाही देणार नाही.

छपरा येथील पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या मद्य कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात मद्य गायब आहे. यातूनच ही विषारी दारू बनवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यातूनच हे मृत्यू झाले आहेत. ते कोठूनही पुरवले जात नसून पोलीस ठाण्यातून देण्यात आला. याचा पुरावा म्हणून गावकऱ्यांनी व्हिडिओ तयार करून उत्पादन शुल्क विभागाचे मुख्य सचिव के. के. पाठक यांना पाठवला.

तक्रारीनंतर मुख्य सचिवांनी कारवाई केली आणि सहआयुक्त कृष्णा पासवान आणि उपसचिव निरंजन कुमार यांना चौकशीसाठी पाठवले. त्यांनी पाहिले तर जप्त केलेल्या स्पिरिटचे ड्रम खुले होते. मद्य गायब होते. चौकीदार आणि पोलिसांच्या मदतीने पोलिस ठाण्यातून व्यावसायिकांना स्पिरीट पुरवले जात होते, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. अनेक कंटेनरची झाकणे गायब आहेत.

दारूमुळे मृतांचा आकडा ६० वर पोहोचला आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी ५ मृत्यू झाले. यानंतर बुधवारी २५  आणि गुरुवारी १९ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळपर्यंत आणखी १० जणांनी बनावट दारू गिळली. छपराच्या मशरख, अमनौर आणि मधौरा भागात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. हे लोक खासगी दवाखान्यात किंवा घरी उपचार घेत होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन जणांचा समावेश आहे, जे स्वत: दारू विकत होते.