कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेला शासनाच्या विविध विकास योजनेतून ४ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मूलभूत सेवासुविधा, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनच्या मोटारसायकल आदींचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष दिपक गायकवाड यांनी दिली.

दिपक गायकवाड म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजनेतून २ कोटी २५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील १ कोटी ६१ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजनाकडून १० लाख, अग्निशमन मोटारसायकली दोन आणि अग्निशमन दलासाठी अग्निरोधक गणवेशाकरीता ६० हजार रुपये मंजूर झाले आहेत. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिका मंजूर झाली असून प्रशासकीय मान्यता ही मिळाली आहे. विशेष रस्ता अनुदान निधीतून ७ कोटी रुपयांची शहरात अंतर्गत प्रभागनिहाय डांबरीकरण, काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ऐतिहासिक कृष्णा घाटाचे सुशोभीकरण करण्यासाठी १ कोटी ३० लाख मंजूर झाले आहेत. तसेच पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून पालिकेला निधी उपलब्ध झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे, फारुख जमादार, महादेव बागलकोटे, लेखापाल राजेंद्र महिंद्रकर, प्रफुल्ल पाटील, अजित देसाई, कृष्णा नरके, दादासो गवळी, धोंडीराम माळी, दिलीप बंडगर, योगेश पाटुकले, नामदेव धातोंडे आदी उपस्थित होते.