नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  शिवसेनेचे १४ नव्हेच, तर १८ खासदार आपल्याबरोबर आहेत. सर्वजण येणार असून, त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे हे मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत:ची कार्यकारिणी जाहीर केली. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वकिलांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधी भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे. सध्या खूप चर्चा सुरु आहेत, पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही शिंदे यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून, सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.