सिक्कीम (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये शुक्रवारी लष्कराची एक बस खोल दरीत कोसळून १६ लष्करी जवानांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. उत्तर सिक्कीममधील लाचेनपासून १५ कि.मी. अंतरावरील जेमा भागात ही घटना घडली आहे.

शुक्रवारी सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चटणहून थंगूच्या दिशेने निघाला होता. जेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत जाऊन कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवानांना मृत्यू झाला आहे.

भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केले असून, या दु:खाच्या प्रसंगी ते शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत उभे असल्याचे म्हटले आहे. या कुटुंबांना शक्य ती मदत केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.