कोल्हापूर (प्रतिनधी) : तंत्रज्ञानाचे युग हे सर्वांच्याच कल्याणाचे ठरत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकांनेक गोष्टी सुखकारक बनल्या आहेत. याच पैकी एक गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप. सध्या व्हॉट्सॲप ग्रुपचा एखाद्या समाजोपयोगी कामासाठी योग्यरीत्या वापर होऊ लागला आहे. कोल्हापुरातील जवाहरनगर येथील रोहित कदम आणि शिवाजी पेठेतील धनंजय नामजोशी हे युवक रुग्णांसाठी मदत पुरवत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ते तातडीने प्लेटलेटस् देऊन रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य करत आहेत.

कोल्हापुरातील रोहित कदम यांनी आजपर्यंत ४०० हून अधिक तरुणांच्या माध्यमातून प्लेटलेटस् देऊन रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. नामजोशी यांनीही तरुणांच्या माध्यमातून १३७ जणांना प्लेटलेटस् मिळवून देत रुग्णांना आधार दिला आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे प्राण वाचवण्याचे कार्य केले आहे. गरजू रुग्णांना योग्य वेळात रक्त आणि प्लेटलेट्सचा पुरवठा ते व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून करत आहेत.

जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्त किंवा प्लेटलेट्स चढवाव्या लागतात. तेव्हा त्यांच्या नातेवाइकांचा त्यासाठी शोध सुरू होतो; पण बऱ्याच वेळा त्या ब्लड ग्रुपचे रक्त किंवा प्लेटलेट्स उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी रुग्णाला आणि नातेवाइकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी काही युवकांनी एकत्र येत एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला. ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व रक्तदाता सहभागी होत गेले.